कपाशी पिकावरील शेंदरी बोंड आळीचे शास्त्रीय नाव (Pectinophora Gossypiella) असून ही कपाशी पिकावरील अतिशय हानिकारक कीड आहे. ही बोंड अळी बोंडाच्या आत राहून उपजीविका करते, बाहेरून या किडीच्या प्रादुर्भावाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे वेळीच सावधान होऊन शेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
कपाशी पिकावरील शेंदरी बोंडअळी ची ओळख व जीवनक्रम :-
कपाशीवरील शेंदरी बोंडअळीच्या चार अवस्था असतात (अंडी, अळी,कोश व प्रोढ पतंग).
प्रौढ मादी पतंग संपूर्ण जीवनमानामध्ये सुमारे 150 ते 200 लांबुळकी चपटी व पांढरी अंडी रात्रीच्या वेळी घालते. ही अंडी पाते, फुलांवर, कोवळ्या बोंडांवरती अलग अलग किंवा छोटे समूहात असतात.
अंडी अवस्था 3-6 दिवसाची असते. अंड्यामधून बाहेर आलेल्या अळीचा रंग पांढुरका व डोके तपकिरी असते.
अळी अवस्था 9-14 दिवसांची असते. पूर्ण वाढ झालेली अळी बोंडाला छिद्र पाडून, जमिनीवरील पालापाचोळा, मातीत किंवा उमललेल्या कापसाच्या सरकी मध्ये कोष अवस्थेत जाते.
कोष अवस्था 8-13 दिवसांची असते. अळी प्रतिकूल हवामान शीत तापमान परिस्थितीत अन्न पाण्याशिवाय सुप्त अवस्थेत (Diapause) राहू शकते.
बोंडअळीचा पतंग आकाराने लहान बदामी राखाडी रंगाचे असून पखांवरती बारीक काळे ठिपके असतात.
प्रौढावस्था ही 4 ते 8 दिवसांची असते. मादी नरापेक्षा जास्त दिवस जगते.
बीटी कपाशीच्या शेंदरी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची कारणे :-
कपाशीच्या फरदडी खालील क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ.
जास्त कालावधीचे कपाशीचे संकरित वाण.
कच्चा कापसाची जास्त कालावधीपर्यंत साठवणूक.
बिटी जनुकास प्रतिकार शक्ती.
कपाशीची लवकर लागवड.
कपाशी पिकामधील शेंदरी बोंडअळी वरील उपाय
एकात्मिक व्यवस्थापन
कपाशी पिकाची फरदड घेऊ नये.
हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये मेंढ्या,शेळ्या किंवा जनावरे चरण्यासाठी सोडाव्यात.
हंगाम संपल्याबरोबर पराटीचा बंदोबस्त करावा. शेताजवळ किंवा शेतामध्ये पराटी रचून ठेवू नये.
पिकांची फेरपालट करावी. अंबाडी, भेंडी अशी पिके कपाशी पूर्वी किंवा नंतर घेऊ नयेत.
कामगंध सापळे आणि प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
ट्रायकोग्रामाटॉयडीया बॅक्टरी या परोपजीवी कीटकांचे कार्ड (1.5 लक्ष अंडी/हे.) पिकावर लावावेत.
बोंडअळीची आर्थिक नुकसानीची पातळी
8-10 पतंग प्रति सापळा सलग 3 रात्री.
5-10% प्रादुर्भावग्रस्त हिरवी बोंडे.
ही आर्थिक पातळी शेंदरी बोंड अळी या किडीने ओलांडल्यानंतर खालील रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी. (प्रति पंप 10 लिटर पाणी)
50-60 दिवसांनी पाते व फुले लागणे
5% निंबोळी अर्क (500 मिली) + निम तेल (50 मिली) + डिटर्जंट पावडर (10 ग्रॅम).
60-90 दिवसांनी फुलावस्था ते बोंडे लागणे
प्रोफेनोफॉस (50
% EC) 20 मिली अथवा क्विनॉलफॉस (25% EC) 20 मिली.
90-120 दिवसांनी बोंडे लागणे ते बोंडे परिपक्वता
Profenophos 40% + Cyper 4% (20 मिली.)
ऍक्टिव्ह इमा (5% SG) 5 ग्रॅम अथवा अक्टिफेट (75% SP) 10 ग्रॅम.
टिप:- वरील कीटकनाशकांची शिफारस साध्या पंपासाठी केलेली आहे. पावर स्प्रेयर साठी वरील कीटकनाशकांचे प्रमाण हे तीन पट करावे.
कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी
एकच वेळी एकापेक्षा जास्त कीटकनाशकांचे मिश्रण करून फवारू नये.
त्वचेला इजा होऊ नये म्हणून कीटकनाशके उघड्या हाताने हाताळू नयेत, हात मोज्यांचा वापर करावा.
किटकनाशकांची श्वासाद्वारे विषबाधा होऊ नये म्हणून फवारताना नाक आणी तोंडाला मास्क लावावा.
फवारणीचे तुषार डोळ्यात जाऊ नये यासाठी डोळ्यांना गॉगल लावावा.
मार्गदर्शक :-
तुकाराम वरकड
Msc. (Agri.) कृषी कीटक शास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी.
मो. 9921471577
Comments